पारगावच्या युको शाखेत ग्राहक त्रस्त्त: २० दिवसांपासून कामे खोळंबली

पारगाव,(वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पारगाव येथील युको बँकेला गेली अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची घरघर लागली आहे. आता १५ ते २० दिवसांपासून मुख्य शाखा अधिकारी नसल्याने अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पारगाव व परिसरातील चार पाच गावांमध्ये एकमेव युको बँक हिच एक राष्ट्रीयीकृत बँक असल्याने या बँकेत सातत्याने गर्दी असते. यापूर्वी कित्येक दिवस अगदी मोजक्या कर्मचारी वर्गावर या शाखेचा कारभार चालू होता. त्यावेळीही ग्राहकांना तासनतास वेळ खर्च करावा लागला होता. बँकेची ऑनलाइन सेवा तर वारंवार बंद राहते.
सर्व्हर डाउनचा प्रॉब्लेम नित्याचाच झाला आहे. त्यात शाखाधिकारी उपस्थित नसल्याने अनेक ग्राहकांची बँकेची कामे रखडलेली आहेत. तरी वरिष्ठ कार्यालयाने तातडीने दखल घेऊन ऍडिशनल शाखाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्राहकवर्गातून होऊ लागली आहे. झोनल अधिकारी पुणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

