नगर -केरळ मधील हत्तीनीचा मृत्यू पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांकडून या मानवीय कृतीचा निषेध केला गेला. हे असे कृत्य निंदनियच आहे. अशा परिस्थितीत पारगाव ग्रामपंचायत व पारगाव येथील पक्षीप्रेमी विशाल चव्हाण व खुशाल शिंदे यांनी एक सकारात्मक काम हाती घेवून पक्षांच्या दाना-पाण्याची व्यवस्था केली आहे.
समाज माध्यमांवर पक्षांच्या दाना पाण्याची सोय करता येईल, असे पत्र्याच्या रिकाम्या डब्यापासून बनवलेले एक पात्र व्हायरल होत होते. ते पाहून गावातील या तरुणांनी असेच पात्र बनवायचे ठरवले. अगदी कमी खर्चात तयार होणाऱ्या या पात्रात पक्षांना धान्य आणि पाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. तरुणांनी केलेल्या या कामाचे सरपंच मीनाक्षी शिंदे व व्याख्याते गणेश शिंदे यांनी कौतुक केले.
तसेच गावात ठिकठिकाणी झाडावर हे पात्र लाऊन पक्षांच्या दाना पाण्याची सोय करण्याचा निर्णय ग्रामपंचायत ने घेतला व त्या सकारात्मक उपक्रमाची सुरवात केली. याकामी पुढाकार घेणाऱ्या विशाल चव्हाण व खुशाल शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपसरपंच व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
लहानपणी आपण मुलांना एक गाणं शिकवायचो चिऊ ये दाणा खा, पाणी पी आणि भुरकन उडून जा… पण हे गीत निवळ गाण्या पुरते मर्यादित न ठेवता निसर्गाची परिस्थिती पाहता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. भूतदया प्राणीमात्रांवर प्रेम हे विषय निबंधा पुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रुजविण्याची गरज आहे आत्ताच्या परिस्थितीत पारगाव मधील या तरुणांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे
गणेश शिंदे ,पारगाव