समाजातील गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून पारगाव (ता. आंबेगाव) येथील आदर्श सरपंच बबनराव ढोबळे यांची अनेक समाजाभिमुख कामे प्रेरणादायी ठरत आहे. बबनराव ढोबळे एकीकडे वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर आणि हातात टाळ घेऊन भजन-कीर्तनात रमणारे आहेत, तर दुसरीकडे राजकारणात कार्यरत असताना समाजाची सेवा करून आपले कर्तव्य पार पाडत गोरगरिबांची कामे करून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व आहे. गावातील विकासाची कामे करून त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत गावाचा चेहरामोहरा बदलून एक आदर्श गाव निर्माण केले आहे. तरुण वयातच राजकारणाची आवड आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील शेतकऱ्याच्या कुटुंबात बबनराव नामदेव ढोबळे यांचा जन्म झाला. शेतात काबाडकष्ट करून त्यांचे वडील कुटुंबाची उपजीविका करीत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पर्यायाने बबनराव यांना शाळा सोडावी लागली आणि वडिलांना मदत म्हणून ते शेतीच्या कामात हातभार लावू लागले. घरात समाजसेवेची पार्श्वभूमी असल्याने त्यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड निर्माण झाली. गावातील धार्मिक कार्यक्रमात ते मोठ्या प्रमाणात सहभागी होत असत. मित्रांसोबत तुकाईदेवी मंडळ, गणेश उत्सव मंडळ, अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि सहजच समाजसेवेची व राजकीय आवड निर्माण झाली. त्यामुळे ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांत सक्रिय होत. गावातील आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेणे, मुक्तादेवी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन या सोहळ्याचे नियोजन, तसेच आळंदी येथे धर्मशाळा बांधण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग नेहमीच असतो. पाच वर्षांत गावाचा कायापालट सरपंच बबनराव ढोबळे यांनी विकासकामाचा धडाका लावून तब्बल 45 कोटी रुपयांची विकासकामे केली. पारगावच्या वाड्या-वस्त्यांवरील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली. अंगणवाड्यांच्या इमारती, गावठाणामध्ये सिमेंटचे रस्ते, बंदिस्त गटारे, तसेच बाजारतळाचे बांधकाम करण्यात आले. 14व्या वित्त आयोगातून मागासवर्गीय लोकांसाठी अनेक कामे केली आहेत. दिव्यांगांना सायकल वाटप, व्यवसायासाठी गाळेवाटप करण्यात आले आहे. करोना काळात गावात स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच गोरगरिबांना धान्य, किराणा, भाजीपाला वाटप, ग्रामस्थांची आरोग्य तपासणी आणि लसीकरण करण्यात आले. स्मशानभूमी दुरुस्ती व शेडची उभारणीची कामे करून स्मशानभूमी सुशोभिकरण करण्यात आली. आधुनिक सुसज्ज वाचनालय इमारत व वाचनालयासमोर ब्लॉक बसवण्यात आले. गावातील वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी 14 कोटी रुपयांची जलजीवन मिशन शुद्ध पाण्याचा प्रकल्प करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होणार आहे. ही सर्व कामे राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आदर्श सरपंच बबनराव ढोबळे यांनी पाच वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी आणि गावच्या विकासासाठी जी कामे केली. ती कौतुकास्पदच आहेत. ग्रामस्थांनी दिली “सरपंच’पदाची संधी समाजसेवेची आवड असल्याने गावातील लोकांनी बबनराव ढोबळे यांना तरुण वयातच ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून दिले व त्यांनी गावच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. 2010 मध्ये त्यांनी गावचे उपसरपंचपद भूषविले. त्यावेळी त्यांनी गावात राबवलेल्या योजना गावाच्या विकासाला पूरक ठरल्या. त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीच्या 2018 च्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदाच्या निवडणुकीत ते सरपंचपदी विराजमान झाले. गावाचे पहिले लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान त्यांनी मिळविला. गावाचा कारभार करीत असताना पाच वर्षांत गावातील सर्व घटकांतील लोकांना, तसेच ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार विविध विकासकामे केली. संकलन : लक्ष्मण ढोबळे, पारगाव शिंगवे