हडपसर, – आजकालच्या जीवनात शिक्षण घेत असताना पूर्वी शालेय पाटी व वहिला जे महत्त्व होते ,ते आता राहिले नसेल.आज जीवनात जगातील सर्व ज्ञान जे कदाचित शाळेच्या वर्गात सर्व मिळू शकत नाही. जे संगणक व गुगल च्या माध्यमातून क्षणात मिळत आहे.आता आपल्याला किती टक्के गुण मिळाले याला फारसे महत्व राहिले नाही. परंतु, विद्यार्थी आपल्या आयुष्यात भविष्यात काय करू इच्छितो ,त्याच्या आवडीचे कोणते क्षेत्र आहे. याकडे लक्ष वेधून शाळेतून व घरातून प्रोत्साहन दिले पाहिजे. असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वानवडी विभाग यांच्या वतीने आयोजित “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व वानवडी परिसरातील विद्यार्थ्यांना वही वाटप” हा कार्यक्रम माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आयोजित केला होता. त्यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, नंदा लोणकर,श्रीकांत पाटील, मारुतीराव (नाना) जगताप, संदीप जगताप, मोहसिन शेख,प्रफुल्ल जांभुळकर,शमिका जांभुळकर, शिवाजी शिंदे, अमोल बाचल, संजय भोसले आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की,पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे करीअर निवडण्याची संधी द्यावी, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी परिश्रमा शिवाय पर्याय नसतो.मात्र, मुलांनी जर त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची आशा बाळगली असेल तर त्यांना निश्चित यश मिळविता येईल.
कोरोना काळातही शिक्षणात विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी- प्रशांत जगताप
गेल्या दोन वर्षांच्या कोविडच्या काळात ऑफलाइन पद्धतीने शिक्षण बंद असताना देखील उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीचा वापर करून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी या कठीण कालावधीमध्येही परीक्षांमध्ये नेत्रदिपक अशी कामगिरी केली. अशी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा त्यांना आणखी काम करण्यास प्रोत्साहन मिळावे. या हेतूने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत व्हावी, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या हेतूने वानवडी परिसरातील तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.
– प्रशांत जगताप शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पुणे शहर.
.