पुणे – जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने यापूर्वीच पाऊले उचलले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने कुपोषणमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता कुपोषित बालकांच्या पालकांना रोहयोकडून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षापासून केली जाणार आहे.
मुंबईला “रोहयो’ची बैठक झाली. या बैठकीसाठी कुपोषणमुक्तीसाठी प्रभावी काम केलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कुपोषित बालकांच्या पालकांना रोहयोतून रोजगार देण्यावरही चर्चा झाली. जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा शोध घेतल्यानंतर त्यांची कौटुंबिक स्थिती पाहिली जाईल. त्यामध्ये कुपोषित बालकाच्या पालकांना काम मिळवताना अडचणी येत असतील, तर त्यांना रोहयोतून रोजगार देण्यात येणार आहे. त्यातून जे उत्पन्न मिळेल त्यातून घरात आवश्यक असणारे साहित्य व आवश्यक खाद्यपदार्थ घेण्यासाठी झेडपीचा महिला व बालविकास विभाग प्रोत्साहित करेल. त्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांची मदत घेण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी पुढील वर्षी होणार असून, येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत 846 पैकी 677 बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता कुपोषित बालकांच्या पालकांना रोजगार देण्यात येणार असल्याने कुपोषण बालकांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे.