सातारा : शाळा लवकरात लवकर सुरु करण्याची पालकांची मागणी

मुलांच्या इतर कुरापती वाढल्या; ऑनलाइनच्या नावाखाली मोबाइलचा वापर इतर गोष्टींसाठी बनला नित्याचा
रेठरे बुद्रुक – ऑनलाईन शिक्षणात मुलांचा आत्मविश्वास कमी झाला असून मुलांच्या ऑनलाईन इतर कुरापत्या वाढल्या आहेत. ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांमध्ये चॅटिंगचं फॅड सुरू झाले असल्याच्या पालकांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तेव्हा लवकरात लवकर शाळा सुरू करणे गरजेचे आहे.अशी मागणी पालकांच्यामधून जोर धरू लागली आहे.
करोना महामारीमुळे गेली दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागामार्फत शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसले तरी शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मुलांच्या विविध उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग नाही. तेथे मुलांमधील चिडचिडेपणा वाढला आहे. ज्या मुलांना थोडया प्रमाणात घराबाहेर पडता येते त्यांच्यात चिडचिडेपणा कमी आहे. काही प्रमाणात ग्रामीण भागांत मुले कमी कंटाळलेली दिसतात. साधारणपणे 14 वर्षापासून पुढील वयोगटातील मुलांमधील प्रश्न अधिक वाढले आहेत. ही मुले काही वेळा पालकांशी बोलत नाहीत. समाजमाध्यमांवर या वयोगटातील मुलांचे चॅटिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे.
आपण कुणाशी बोलतो, कोणत्या गोष्टी सांगतो याची समज या वयोगटात कमी असते. पालकांनाही सर्व गोष्टी नियंत्रित करणे शक्य नसते. त्यातून नव्या समस्या निर्माण होत आहेत. ऑनलाईन तासिका सकाळ सायंकाळ तसेच अभ्यास लेखन करून व्हाट्स अप वरती पाठवावा लागतो. त्यामुळे दिवसभरात पालकां ऐवजी मुलांच्या हातात सतत मोबाईल अथवा टॅब दिसतो आहे. ऑनलाईन तासिकेला जोडूनच गेम खेळणे, व्हाट्स अप वरती चॅटिंग करणे, इंस्टाग्राम वरती व्हिडीओ अपलोड करणे, फेसबुक, मेसेंजर अशा प्रकारे बहुतांशी मुलं या इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहेत.
तज्ञ जाणकार डॉक्टरांच्या निदर्शनास आलेल्या संबंधित वयोगटातील पेशंटमध्ये चिडचिडेपणा, डोकेदुखी, भूक न लागणे, वारंवार रडू येणे, मान व पाठदुखी, झोप न लागणे, मन न लागणे, भीती वाटणे, एकाकी वाटणे, अपचन यांपैकी समस्या जाणवत असनारे सर्वाधिक विद्यार्थ्यी असल्याचे सांगितले जाते.
शाळा बंद असल्यामुळे मुलांचे मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी झाली आहेत. मुलांमधील ऊर्जेला सध्याच्या परिस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. खेळण्यासाठीच्या जागा नसल्यामुळे आणि अनेक घरांमध्ये भीतीपोटी मुलांना सोसायटीच्या आवारातही फिरण्यास किंवा खेळण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे मुलांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढला असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
मुलांची शैक्षणिक प्रगती थांबू नये, अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण व्हावा या चांगल्या हेतूने शिक्षण विभाग विविध ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राबवित आहे. पण मुलं आता ऑनलाईन शिक्षणाला कंटाळली आहेत. आता गरज आहे ती शाळा सुरू करण्याची. तसेच आता बऱ्याच गावामध्ये करोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच गावोगावी लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. तेव्हा करोनामुक्त गावात करोनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरु व्हाव्यात अशी मागणी आहे.





