परभणी : शाळेच्या फीच्या वादातून पालकाला बेदम मारहाण करून जीव घेण्याची धक्कादायक घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हट्टा येथील हायटेक निवासी शाळेत घडली आहे. उखळद गावातील वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार जगन्नाथ हेंडगे (वय ३५) यांना शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. जगन्नाथ हेंडगे यांनी आपली तिसरीत शिकणारी मुलगी पल्लवी हेंडगे हिचा काही दिवसांपूर्वी सदर शाळेत प्रवेश घेतला होता. मात्र तिथे नको वाटत असल्यामुळे टीसी काढण्यासाठी शाळेत संपर्क साधला. मुलीला गावातील शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी प्रवेशावेळी दिलेली रक्कम परत मागितली. यावरून संस्थाचालक चव्हाण यांनी उलट उर्वरित फीची मागणी केली. यातून वाद वाढला आणि चव्हाण दाम्पत्याने हेंडगे यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या हेंडगे यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन करून उखळद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हेंडगे यांच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करत संस्थाचालकावर कठोर कारवाई आणि शाळा बंद करण्याची मागणी केली आहे. हेंडगे हे तीन एकर शेतजमीनीवर आपली उपजिविका भागवत होते. तसेच वारकरी संप्रदायिक कीर्तन-प्रवचन करून समाजप्रबोधनाचे कार्य करत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. संस्थाचालकाच्या राजकीय प्रभावामुळे या प्रकरणात दबाव येऊ नये, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेने परभणी हादरली असून, शैक्षणिक संस्थांमधील फीच्या नावाखालील दादागिरीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.