परभणी :- सर्वसामान्यांचे प्रवासाचे हक्काचे साधन म्हणजे, लालपरी. असे असले तरी राज्यातील परिवहन विभागाच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी बसची दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. कधी या बस अचानक बंद पडत आहेत तर, कधी बसचे पूर्ण छप्परच उडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
परभणीत तर चक्क धावत्या बसचे चाकच निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीच्या गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या भरधाव वेगात असलेल्या बसचे चाक निखळले आणि 100 फूट लांब जाऊन पडले. सुदैवाने बसमधून प्रवास करणाऱ्या 62 प्रवाशांचा जीव वाचला आहे.
गंगाखेड आगाराची बस गंगाखेड हुन पालम कडे 62 प्रवासी घेऊन निघाली होती. गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी जवळ धावत्या बसचे चाक निखळले. तरीही बस धावत होती. ही बाब याच रस्त्यावरून जात असलेल्या पीक अप चालक भागवत मुंडे यांना दिसली त्यांनी तात्काळ बस चालकाला हातवारे करून आवाज करून लक्षात आणून दिले, तेव्हा कुठे बसचालकाने ही बस थांबवली.
यापूर्वी घडलेले प्रकार…
1.छत तुटले, तरीही एसटी नाही थांबली
काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील लालपरीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील एसटीचा पत्रा हा हवेत उडाला आहे. तरी या एसटीचा चालक ही बस भरधाव वेगाने चालवत होता.
2. एका हातात स्टिअरिंग तर दुसऱ्या वायपर
नांदेड जिल्ह्यातील एका एसटी बसचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एसटी बसचा चालक एका हाताने स्टिअरिंग आणि दुसऱ्या हाताने काचेवरील वायपर फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. भर पावसात बसचा वायपर बंद झाल्याने चालकावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. अशा पद्धतीने धोकादायक एसटी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा व्हिडीओ काढून एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता.