Parbhani–Pusad Railway Line: औंढा नागनाथला जोडणारा परभणी–पुसद रेल्वेमार्ग उभारण्याची मागणी
Parbhani–Pusad Railway Line:

मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ लवकरच रेल्वे राज्यमंत्री वि. सोमण्णा यांची घेणार भेट
Parbhani–Pusad Railway Line: महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या औंढा नागनाथला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी परभणी–पुसद नवीन रेल्वेमार्ग उभारण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. या रेल्वेमार्गासाठी लवकरच रेल्वे राज्यमंत्री वि. सोमण्णा यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाने दिली.
औंढा नागनाथ हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे (नागेश्वर) ज्योतिर्लिंग मानले जाते. या तीर्थक्षेत्रात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे औंढा नागनाथचा रेल्वे नकाशावर समावेश होणे आवश्यक असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. त्यासाठी औंढा नागनाथ–कळमनुरी या सरळ मार्गाने सुमारे १२५ किलोमीटर अंतराचा परभणी–पुसद नवीन रेल्वेमार्ग उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
महासंघाच्या मते, परभणी हे मराठवाड्यातील जिल्हा केंद्र असून महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. संभाजीनगर, नांदेड, हिंगोली आणि परळी वैजनाथ या चारही दिशांना रेल्वेमार्गाने जोडलेले हे महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच कळमनुरी हे महत्त्वाचे व्यावसायिक व प्रशासकीय केंद्र असून पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातील पुस नदीकाठी वसलेले विकासोन्मुख प्रमुख शहर आहे.
धार्मिक तसेच विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या परभणी–पुसद रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही महासंघाने केली आहे. वर्धा–नांदेड नवीन रेल्वेमार्ग पुसदपर्यंत पूर्ण झाल्यानंतर पुसद–परभणी हा नवीन मार्ग तयार झाल्यास वर्धा, नागपूर, कोलकाता तसेच संपूर्ण उत्तर-पूर्व भारतातून बीड, नगर, पुणे, पनवेल, संपूर्ण कोकण विभाग, पंढरपूर, मिरज, बेळगाव आणि गोवा या भागांपर्यंत जाण्यासाठी मराठवाड्यातून सर्वात जवळचा व सरळ रेल्वेमार्ग उपलब्ध होईल, असा दावा महासंघाने केला आहे.
ही माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, सुरेश नाईकवाडे, डॉ. राजगोपाल कालानी, रितेश जैन, श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित, रूस्तम कदम, माणिकराव शिंदे, मंगला मुदगलकर, कदीर लाला हाश्मी, दिलीप बोरूळकर, संतोष कंची आदींनी दिली.





