Parbhani News : धक्कादायक ! चिमुकल्याला पोटाला बांधून विवाहितेची नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या

परभणी : विवाहित महिलेने स्वतःच्या दोन वर्षाच्या चिमुकल्यास आपल्या पोटाला बांधले आणि गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आपल्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. सदरील घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता सुमारास उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेत दोघा माय लेकरांचा मृत्यू झाला आहे. पोटच्या मुलालासोबत घेऊन विवाहितेने आत्महत्या केल्याने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी महिलेचे आधारकार्ड व लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. संबंधित महिलेचा पती सासरा व सासू फरार झाले असून त्यांच्यावरच संशय व्यक्त केला जात आहे. आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव प्रतिभा गजानन भामरे (वय 25) वर्ष राहणार भांबरवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी असे आहे. तर दोन वर्षाच्या चिमुकल्याचे नाव माणिक असे आहे.
याविषयी विस्तृत माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील खळी पुलाजवळ असलेल्या गोदावरी नदी पात्रात प्रतीक्षा भामरे या महिलेने आपल्या माणिक भामरे या दोन वर्षीय चिमुकल्यास कमरेला बांधून नदीपात्रात उडी घेतली. मागील काही दिवसात दमदार पाऊस झाल्याने गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. पाणी जास्त असल्याने माय लेकराचा नदी पात्रात पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पीएसआय राम गीते जमादार मुंजा वाघमारे आणि राहुल वावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.





