Parbhani Muslim Mayor : ज्या मराठवाड्यात ‘खान हवा की बाण हवा’ असा प्रचार केला गेला, त्या परभणी शहरात (Parbhani Muslim Mayor) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धाडसी आणि पुरोगामी पाऊल उचलले आहे. हिंदुत्ववादी ओळख असलेल्या या शहराच्या महापालिकेच्या महापौरपदी मुस्लिम उमेदवार सय्यद इक्बाल यांना संधी देऊन पक्षाने आपली समावेशक आणि धर्मनिरपेक्ष वाटचाल वेगाने पुढे नेली आहे. राज्यातील शिवसेना (उद्धव गट)चा हा एकमेव मुस्लिम महापौर असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा होत आहे. परभणी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळे सत्ता स्थापन झाली. या आघाडीच्या बहुमताच्या जोरावर सय्यद इक्बाल यांनी भाजप उमेदवार तिरुमाला खिल्लारे यांचा ३९ विरुद्ध २६ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली. नगरसेवक रचना आणि मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य महापालिकेत एकूण ६५ नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीत शिवसेनेने शहराची सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिक संख्येने मुस्लिम उमेदवार उभे केले. परिणामी, २५ नगरसेवकांपैकी तब्बल १३ मुस्लिम निवडून आले. अल्पसंख्याक नगरसेवकांच्या आग्रहामुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या एकमताने महापौरपदासाठी मुस्लिम चेहरा देण्याचा निर्णय घेण्यात आला. Parbhani Muslim Mayor खासदार आणि आमदारांची एकजूट परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी सर्व मतभेद विसरून महापालिकेला पूर्ण ताकद लावली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने शिवसेनेच्या मागे भक्कम उभा राहिल्याने अल्पसंख्याक मतपेढी कायम राखण्यासाठी बंडू जाधव यांनी विशेष नियोजन केले. याच धोरणाचा भाग म्हणून सय्यद इक्बाल यांना महापौरपद मिळाले. कोण आहेत सय्यद इक्बाल? सय्यद इक्बाल यांचा राजकीय वारसा नाही. त्यांच्या कुटुंबात यापूर्वी कुणीही सक्रिय राजकारणात नव्हते. फक्त दोन महिने आधीच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या इक्बाल यांचे भाऊ मोठे कंत्राटदार आहेत. व्यवसायातून शहरातील अनेक मान्यवरांशी त्यांचे संबंध जुळले. महापालिका निवडणुकीदरम्यान स्थानिक प्रश्नांवर प्रचार करून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. सय्यद इक्बाल स्वच्छ प्रतिमेचे आणि सर्वसमावेशक विचारसरणीचे आहेत. सार्वजनिक जीवनात त्यांच्यावर कोणताही आरोप नाही. टोकाच्या विचारसरणीचा त्यांना स्पर्शही नाही. सर्व समाजातील लोकांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. याच कारणाने शिवसेनेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नवनिर्वाचित महापौरांची प्रतिक्रिया महापौरपदी निवड झाल्यानंतर सय्यद इक्बाल यांनी सकारात्मक आणि विकासकेंद्रित प्रतिक्रिया दिली. “आता ‘खान हवा की बाण हवा’ हा प्रचार सोडूया, विकासावर बोलूया,” असे ते म्हणाले. शहरात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी ठाम प्रयत्न करेन. खासदार संजय बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आभारी आहे. 65 नगरसेवकांपैकी कुणालाही अंतर देणार नाही. पक्षभेद न बघता सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असेही त्यांनी सांगितले.