(प्रतिनिधी, हिंगोली) – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारात रविवारी (दि. २१) बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनपाल यांनी वाघाळा येथे भेट देऊन प्राण्याच्या पायाच्या ठश्यांची पहाणी केली. सदरील ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगून किमान आठ दिवस ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहनकेले आहे. रविवारी (दि. २१) सायंकाळी साधारणतः ६ वाजण्याच्या सुमारास शेख आब्बास शेख कबाबामियाँ यांना शेतातून घरी येत असतांना ऊसाच्या बांधावर बिबट्यासदृश प्राणी उभा असल्याचे दिसले. निरखून पाहिले असता तो प्राणी वाघासारखा असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते घाबरले. त्यांनी तात्काळ आरडा ओरडा करीत इतरांना आवाज दिला. यावेळी तो प्राणी ऊसाच्या शेतात शिरल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर ही माहिती ग्रामस्थांना कळताच गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण सद्यस्थितीत शेतामध्ये पावसाने उघडिप दिल्याने खरीपाच्या पिकांच्या मशागतीची कामे सुरू आहेत. बिबट्या आला असल्याची माहिती मिळाल्याने सोमवारी (दि.२२) बहुतांशी शिवार माणसांअभावी ओस पडल्याचे चित्र होते. या विषयीची माहिती आणि पावलांचे ठसे सरपंच बंटी घुंबरे यांनी वनपाल विठ्ठल बुचाले यांना पाठविले. वनपाल बुचाले त्यांनी सरपंच बंटी घुंबरे, प्रत्यक्षदर्शी शेख आब्बास आणि ग्रामस्थांसह स्थळ पाहणी करून संबंधित प्राण्याच्या पाऊल खुणांचे बारकाईने निरीक्षण केले. या पाऊल खुणा बिबट्याच्या असल्याचे सागून ग्रामस्थांनी आठ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच एकट्याने शेतात जाणे टाळावे. घुंगरू बांधलेली काठी हातात ठेवावी. गळ्यात रुमाल बांधावा. आखाड्यावर प्रकाश ठेवावा. एकट्याने शेतात झोपू नये, लाकूड पेटलेले ठेवावे असे काही उपाय सांगून बिबट्या आल्या मार्गाने परत जाईल. त्यामुळे किमान आठ दिवस सतर्कता राखावी, असे आवाहन केले आहे. गेल्या दोन दिवसापुर्वी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अंजनवाडा शिवारात बिबट्याचे दर्शन झाले होते. आज पुन्हा परभणी जिल्ह्यातील वाघाळा शिवारात बिबट्या आढळून आला आहें, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणात पसरले आहें. सध्या शेतातील शेतकऱ्यांचे फवारणीचे कामे जोमात चालू आहेत, मात्र शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भिती वाटत आहें. त्यामुळे वन विभागाच्या वतीने या बिबट्याचा तात्काळ शोध घेऊन बंदिस्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहें.