Param Sundari: ‘परम सुंदरी’ चित्रपटगृहात प्रदर्शित; प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया चर्चेत

Param Sundari: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा नवा चित्रपट ‘परम सुंदरी’ आज (२९ ऑगस्ट) पासून देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या रोमँटिक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर, विशेषतः ‘एक्स’ वर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.
प्रेक्षकांनी चित्रपटातील जान्हवी आणि सिद्धार्थची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूपच आकर्षक असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहून तो रोमँटिक आणि एंटरटेनिंग असल्याचं सांगितलं. काहींनी मात्र चित्रपटाच्या कथानकावर टीका करत, “हा चित्रपट काही प्रमाणात शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ची आठवण करून देतो,” असं म्हटलं आहे.
एका युजरने लिहिलं,“सिद्धार्थ आणि जान्हवीची जोडी फ्रेश वाटते, गाणीही छान आहेत, पण कथानक कुठेतरी आधी पाहिल्यासारखं वाटतं.” दुसऱ्या एका प्रेक्षकाने म्हटलं ,“परम सुंदरी हा सिनेमा मसाला एंटरटेनर आहे, जो मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.”
चित्रपटातील गाणी, लोकेशन्स आणि ॲक्शन सीन्स विशेष कौतुकास पात्र ठरत आहेत. मात्र, काही प्रेक्षकांना कथा थोडी अंदाजे असल्याने त्यांच्याकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तरीदेखील, जान्हवी कपूरच्या अभिनयाचं आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या स्टायलिश लूकचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘परम सुंदरी’चा बॉक्स ऑफिसवरील पहिला विकेंड जोरदार राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जान्हवी आणि सिद्धार्थच्या या जोडीला पुढील काही दिवसांत प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





