Param Sundari movie : प्रदर्शनापूर्वीच ‘परम सुंदरी’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; तो सीन काढून टाकण्याची मागणी

Param Sundari movie : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या ‘परम सुंदरी’ या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. हा सिनेमा २९ अॅागस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच एका सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका धार्मिक समुदायाने सिनेमाला सीबीएफसीने दिलेल्या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात….
सिनेमातील एका रोमँटिक दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या एका रोमँटिक सीनवर वॉचडॉग फाउंडेशन नावाच्या ख्रिश्चन गटाने आक्षेप घेतला आहे. त्यांनी या संदर्भात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी), मुंबई पोलिस, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले आहे. कॅथोलिक समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्याने कलाकारांविरोधात एफआर नोंदविण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
दृश्य काढून टाका, नाहीतर….
चर्च हे ख्रिश्चनांसाठी एक पवित्र स्थान आहे आणि त्यात अश्लील सामग्री दाखवू नये. हे दृश्य कॅथोलिक समुदायाच्या भावनांनाही दुखावते, असं सांगण्यात आलं आहे. तसेच फाउंडेशने सिनेमातील संबंधित दृश्य प्रमोशनल व्हिडीओतून काढून टाकले नाही तर तीव्र निषेध केला जाईल, असा इशारा दिला आहे.
परम सुंदरी हा सिनेमा सिद्धार्थ आणि जान्हवी कपूर यांचा रोमँटिक सिनेमा आहे. येत्या २९ अॅागस्टला हा सिनेमा थिएटरर्समध्ये रिलीज होणार आहे. परमच्या भूमिकेत सिद्धार्थ आहे, तर जान्हवी सुंदरीच्या भूमिकेत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केलं आहे, तर या सिनेमात राजीव खंडेलवाल, आकाश दहिया आणि मनजोत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.





