– संदीप वाकचौरे केंद्र सरकारच्यावतीने ‘परख 2024’चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. देशभरातील विविध राज्य सरकार, व्यवस्थापन, लिंग, संवर्गनिहाय संपादणुकीचा ताळेबंद या अहवालात मांडण्यात आला आहे. ‘परख’चा अहवाल पाहिला असता देशातील शिक्षणाचा संपादणूक (अध्ययन क्षमता) स्तर ङ्गारसा उंचावताना दिसत नाहीये. विकासाची झेप ज्या विज्ञान आणि गणितासारख्या विषयांच्या तार्किक क्षमतेच्या बळावर घेतली जाणार आहे, त्या विषयांची सर्वच इयत्तांची संपादणूक चिंता करावी अशीच आहे. जेथे या विषयांच्या मूलभूत संकल्पनाचे आकलन नाही, तेथे विज्ञान शाखेची पदवी मिळूनही संबंधित क्षेत्रात ठसा उमटावा, असे काही घडताना दिसत नाहीये. तरूणाई सुशिक्षित होत असताना, त्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी करण्यात आपल्याला पुरेसे यश मिळताना दिसत नाहीये. संशोधनासारख्या क्षेत्रातही जागतिक स्तरावर आपले ङ्गारसे दखलपात्र योगदान अधोरेखित होत नाही. तरूणाई संशोधनासारख्या क्षेत्रात अभिरूची दाखवत नाहीये. देशात संशोधनावर खर्चही ङ्गारसा होत नाहीये. देशभरातील विविध सरकारकडून इस्ङ्गायर अवार्ड, विविध स्तरावरील विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. तसेच महाविद्यालयांकडून स्तरावरील सृजनाच्या वाटा सर्वांसाठी खुल्या व्हाव्यात यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. पण त्यांना ङ्गारसा उत्स्ङ्गूर्त प्रतिसाद मिळत नाही. जो मिळतो तो केवळ सहभागासाठीची अट पूर्ण करण्यासाठीचाच असतो. त्यामुळे संशोधनाच्या नव नव्या वाटा शोधल्या जात नाहीत. या सर्वांचे बीज शालेय स्तरावरील शिक्षणातील विज्ञान आणि गणित विषयाच्या संकल्पनांच्या आकलनात दडलेले आहे हे लक्षात घ्यायला हवे आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे गणित, विज्ञान शिक्षणाच्या वाटा रुंदावण्याचा प्रयत्न केला गेला, तरच देशाचे चित्र बदलू शकते. मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक वर्गअध्यापनात नावीन्याच्या वाटा शोधण्याची गरज आहे. त्या वाटा कोण आणि किती रुंदावतो त्यावरच संपादणूक उंचावण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणाचा विचार केला असता, तिसरी, सहावी आणि नववीच्या वर्गात शिकणार्या विविध विद्यार्थ्यांची संपादणुकीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार तिसरीच्या वर्गात दिसणारी संपादणूक इयत्ता जसजशी उंचावत जाते त्याप्रमाणात वाढणे अपेक्षित असताना, संपादणुकीचा स्तर खालावत जात असल्याचे समोर येते आहे. साधारणतः देशातील भाषेचा स्तर उंचावलेला दिसत असला, तरी ङ्गार समाधानकारक आहे असे चित्र नाही. गणित आणि विज्ञानाच्या संदर्भाने संपादणूक चिंता करावी अशीच आहे. अशा स्थितीत आपल्याला त्या विषयातून अपेक्षित दृष्टिकोन आणि तार्किक क्षमता कशा विकसित करता येतील? हा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आलेल्या संपादणुकीच्या विश्लेषणाकडे अधिक गंभीरपणे पाहाण्याची गरज आहे. अन्यथा आपण आजवर ज्या पद्धतीने माहिती संपन्न विद्यार्थी घडवत आलो आहोत त्याप्रमाणे भविष्यातही विद्यार्थी घडवले जाण्याचा धोका आहे. शेवटी शिकल्यानंतर दृष्टिकोन निर्माण करण्यात अपयश आले तर शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य झाले असे कसे म्हणता येईल? आज विज्ञानाची पदवी धारण केलेली माणसंही अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली दिसताहेत. प्रत्येक घटनेच्या मागे कार्यकारणभाव असतो हे शिकलेले असतानादेखील आपण चमत्काराच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. शालेय स्तरावरील विषयांच्या संकल्पनांचे नीट आकलन न झाल्याने विवेकी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन पेरण्यात शिक्षण अपयशी ठरले. एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आव्हान तर दुसरीकडे दृष्टिकोन निर्माण करण्याचेही आव्हान आजच्या शिक्षण क्षेत्रापुढे आहे. ‘परख’ अहवालाच्या माध्यमातून समोर आलेल्या वास्तवाचा विचार करता, संपादणुकीचा स्तर उंचावण्याबरोबर विषयाची ध्येये, उद्दिष्टे साध्य करण्याचे आव्हान शिक्षणातून पेलावे लागणार आहे. देशभरात झालेल्या सर्वेक्षणानुसार, इयत्ता तिसरीच्या सर्वेक्षणात 27 हजार 741 शाळा आणि 5 लाख 99 हजार 26 विद्यार्थी सहभागी झाले होते. सहावीच्या सर्वेक्षणात 26 हजार 973 शाळा आणि 6 लाख 63 हजार 195 विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता नववीचे वर्ग असलेले 31 हजार 406 शाळा सहभागी झाल्या होत्या आणि 8 लाख 52 हजार 801 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्राचा विचार करता इयत्ता तिसरीच्या 1 हजार 46 शाळा आणि 37 हजार 641 विद्यार्थी आणि 3 हजार 78 शिक्षक सहभागी झाले. इयत्ता सहावीच्या 1 हजार 515 शाळा, 37 हजार 558 विद्यार्थी आणि 4 हजार 194 शिक्षक सहभागी झाले होते. इयत्ता नववीचा विचार करता 1 हजार 726 शाळा सहभागी झाल्या होत्या, तर 48 हजार 460 विद्यार्थी आणि 6 हजार 658 शिक्षकांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. या सर्वेक्षणानुसार देशातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची सरासरी भाषिक संपादणूक शेकडा प्रमाण 64 टक्के इतकी आहे. गणित विषयाची सरासरी संपादणूक 60 टक्के आहे. राष्ट्रीय सरासरीचा विचार करता भाषा व गणिताच्या संपादणुकीत 4 टक्के ङ्गरक आहे. महाराष्ट्राचा विचार करता भाषेची संपादणूक 69 टक्के असून गणिताची संपादणूक 64 टक्के आहे. येथील भाषा व गणितातील संपादणुकीतील ङ्गरक 5 टक्के आहे. इयत्ता सहावीचा विचार करता भाषेची राष्ट्रीय सरासरी संपादणूक 57 टक्के आणि महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 62 टक्के आहे. दोन्हींमधील ङ्गरक 5 टक्के आहे. गणिताचा विचार करता राष्ट्रीय सरासरी संपादणूक 46 टक्के, तर महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 51 टक्के असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 5 टक्के अधिक आहे. विज्ञान विषयाचा विचार करता राष्ट्रीय सरासरी 49 टक्के असून महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 55 टक्के आहे. इयत्ता नववीचा विचार करता भाषेची राष्ट्रीय संपादणूक सरासरी 54 टक्के आहे. तर राज्याची संपादणूक 59 टक्के आहे. येथील संपादणूक ङ्गरक पाच टक्के आहे. गणिताचा विचार करता राष्ट्रीय सरासरी संपादणूक 37 टक्के व राज्याची सरासरी संपादणूक 38 टक्के आहे. येथील ङ्गरक अवघा एक टक्का आहे. विज्ञानाचा विचार करता राष्ट्रीय सरासरी संपादणूक 40 टक्के असून राज्याची सरासरी संपादणूक 42 टक्के असून हा ङ्गरक अवघा दोन टक्के आहे. इयत्ता जशी उंचावत जाते त्याप्रमाणात संपादणुकीतील सरासरीतील ङ्गरक कमी झालेला दिसून येतो आहे. महाराष्ट्रतील संपादणुकीतील विचार करता इयत्ता तिसरी ते नववीमध्ये भाषा विषयात 10 टक्के, गणितातील ङ्गरक 26 टक्के आहे. हा ङ्गरक अधिक चिंताजनक आहे. इयत्ता उंचावत जाते त्याप्रमाणे गणितातील अधिकमोठा ङ्गरक विचार करण्यास भाग पाडतो. गणिताची संपादणूक 37 टक्के आहे. याचा अर्थ 63 टक्के विद्यार्थ्यांना गणिताचे अपेक्षित आकलन नाही. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपातील संकल्पनांचे आकलनच होत नसेल तर संबंधित विषयाच्या क्षेत्रात पुढील काळात त्यांचा टिकाव कसा लागणार, हा प्रश्न आहे. सर्व इयत्तांचा विचार केला तर भाषा हे शिकण्याचे माध्यम आहे. त्या भाषेचे आकलन नसेल, तर इतर विषयाचे आकलनाची शक्यता नाही. गणित व विज्ञानाच्या अध्यापनात बदल करून त्यात प्रायोगिकता आणावी लागेल. कृतीयुक्त अध्ययन अनुभवावर भर दिला गेला तर संकल्पनांचे स्पष्टीकरण होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका आणि पुरेशा प्रमाणात सुविधा सरकारने द्याव्यात. त्याशिवाय विद्यार्थ्यांची संपादणूक उंचावता येणार नाही.