Parakala Prabhakar: हर गली में जंतर मंतर..! निर्मला सीतारामण यांचे पती SIR विरोधात मैदानात
Parakala Prabhakar: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि राजकीय अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर हे २३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या SIR विरोधी देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Parakala Prabhakar: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि राजकीय अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर हे २३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या SIR विरोधी देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहेत. ‘पीपल अगेंस्ट SIR’ (PAS) या आघाडीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचाही सहभाग असणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके हेही सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाहीचे संरक्षण आणि बळकटीकरण करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला विरोध दर्शवण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मोठ्या संख्येने पात्र मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. Parakala Prabhakar:
Har gali me Jantar Mantar !
Friday, 23 October, 2026
People’s March to Restore Democracy
Let’s Rise to the Challenge https://t.co/JFq3tzujsS
— Parakala Prabhakar (@parakala) October 21, 2026
पराकला प्रभाकर यांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत, ‘प्रत्येक गल्लीत जंतरमंतर!’ असा नारा दिला आहे. शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जनमोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या आंदोलनात विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील विविध व्यक्ती सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, निर्मला सीतारमण या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांचे पती पराकला प्रभाकर यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर अनेकदा टीका केली आहे. ‘द क्रुक्ड टिम्बर ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकातून त्यांनी नोटबंदी, बेरोजगारी आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत आपली मते मांडली आहेत.
दरम्यान, पराकला प्रभाकर आणि प्रकाश राज यांच्या संभाव्य सहभागामुळे या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. या देशव्यापी आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि SIR प्रक्रियेबाबतच्या मागण्यांवर पुढे काय घडामोडी होतात, याकडे लक्ष लागले आहे. Parakala Prabhakar:





