“पंकजा मुंडेंना MIM मध्ये येण्याची ऑफर दिली होती..” ओवेसींचा मोठा खुलासा

मुंबई – के चंद्रशेखर राव हे सध्या आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. नुकतंच राव यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी थेट नागपुरात देखील आपल्या पक्षाचं कार्यालय सुरु केलं. अनेक आजी माजी आमदार सध्या बीआरएस पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. के चंद्रशेखर राव यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. अशात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या आमदार देखील नाहीत. पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा पराभव केला होता. त्यानंतर पंकजा समर्थकांनी वारंवार भाजप पक्षावर नाराजी व्यक्त केली होती.तसेच भाजपमध्ये मुंडे विरुद्ध फडणवीस असा सुप्त संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा देखील वारंवार राजकीय वर्तुळात सुरु असतात. अशात ओवेसी यांनी पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात येण्याबाबत ऑफर दिली होती असे विधान केले आहे.
“बीआरएस आधी पंकजा मुंडे यांना इम्तिआज जलील यांनी एमआयएममध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडेंनी याचा विचार करण्याची गरज आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे” असं ओवेसी यावेळी म्हणालेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ज्यामध्ये स्थानिक पक्षांसह इतर राज्यातील पक्षांचा देखिल समावेश आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत आप,बीआरएस,एमआयएम असे अनेक पक्ष देखील उतरणार आहेत. त्यावरूनच आता या नव्या पक्षांनी पावले उचलण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे.





