Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पंकजा मुंडे मैदानात, संताप व्यक्त करत म्हणाल्या…

Pankaja Munde On Prajakta Mali : बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणावर बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. तसेच, महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम केले जात असल्याचे म्हणत सुरेश धस यांनी माफी मागावी, असे म्हटले होते. त्यानंतर चित्रपट, राजकीय क्षेत्रातील अनेकजण तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ताला पाठिंबा दर्शवला आहे.
‘शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’ हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत?, असे पंकजा मुंडे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
‘शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. ‘दुर्दैवी घटना’हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत?…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 29, 2024
चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने!! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी, अशी पोस्ट पंकजा मुंडे यांनी प्राजक्ताच्या समर्थनार्थ केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याशिवाय, तिने सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे. सुरेश धस यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी माफी मागावी, अशी मागणी तिने केली आहे.




