Lok Sabha Election Result 2024 | लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल मंगळवारी 4 जून रोजी जाहीर करण्यात आले. देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 294 जागा तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना 17 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीला जनतेने साथ दिल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांपैकी, महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजप 9, शिंदे गट 7, अजित पवार गट 1, ठाकरे गट 9, शरद पवार गट 8, काॅंग्रेस 13 तर इतर 1 अशा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकाचा चांगलाच झटका बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 42 जागांवर यश आलं होतं. पण हाच आकडा 18 वर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात 15 जागांवर दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. Lok Sabha Election Result 2024 | पंकजा मुंडे यांचा पराभव बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच येथे अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता. अखेर रात्री शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मोठा विजय मिळवला. पंकजा यांना आपल्या विजयाची खात्री होती. मात्र या निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. रावसाहेब दानवे यांचा जालनामधून पराभव भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचाही जालनामधून पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचा विजय झाला आहे. रावसाहेब दानवे हे 1990 आणि 1995 मध्ये महाराष्ट्राची विधासभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1999 पासून सलग 5 वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पण यावेळी रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. हेमंत गोडसे पराभूत नाशिकमध्ये गेल्या दोन वेळा खासदार राहिलेले महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का आहे. हिना गावित यांचा पराभव नंदुबारमध्ये विद्यमान खासदार हिना गावित यांचा पराभव करत काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांनी विजय मिळवला. गोपाल पाडवी यांच्या विजयानंतर नंदुबारचा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसच्या काबिज करण्यात यशस्वी ठरला. राहुल शेवाळे यांचा पराभव दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला. उज्वल निकम यांचा पराभव उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांचा पराभव केला. भाजपला या जागेवर विजयाचा विश्वास होता. मात्र येथे उज्वल निकम यांचा पराभव झाला. यंदा येथून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. सदाशिव लोखंडे यांचा पराभव शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेले शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी येथे विजय मिळवला आहे. सुभाष भामरे यांचा पराभव धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचा विजय झाला. सुभाष भामरे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार धुळ्याचे खासदार होते. त्यांचा 3 हजार मतांनी पराभव झाला. नवनीत राणा पराभूत अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत देखील मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला. खासदार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. संजयकाका पाटील यांचा पराभव सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. संजयकाका गेल्या 10 वर्षांपासून सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार होते. सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. पण काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला. भारती पवार यांचा पराभव दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा देखील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी त्यांचा पराभव केला. कपिल पाटील यांचा पराभव भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा विजय झाला. रामदास तडस यांचा पराभव वर्धा लोकसभा मतदारसंघातदेखील मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे खासदार असलेले रामदास तडस यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी पराभव केला. सुजय विखे पाटील यांचा पराभव अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा: Lok Sabha Result 2024 । मोठी बातमी.! लोकसभेच्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिकिया, म्हणाले….