पिंपरी – ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने पिंपरी चौकात शनिवारी (दि. 26) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे यांच्यासह 41 जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपच्या वतीने शनिवारी (दि.26) पिंपरी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका केली. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे महापौर माई ढोरे यांच्यासह 41 जण व इतर कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.