Satara | पाणीपूजन आयुष्यातील महत्त्वाचा क्षण

गोंदवले, (वार्ताहर)- सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी देखील आनंदी आहे. त्यामुळे पाणीपूजन हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे, असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
गोंदवले बुद्रुक येथील कवट वस्तीवर पाणीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजय गांधी, सोमनाथ भोसले, गुलाबराव कट्टे, विष्णुपंत कट्टे, सूरज पाटील, जीवन कट्टे, श्रीकृष्ण कट्टे, अभिजित कट्टे, नवनाथ धाईंगडे, विशाल कदम, पंकज पाटील यांच्यासह गोंदवलेकर ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आ. गोरे म्हणाले की, क्षमता असणारा नेता पाणी येऊ शकत नाही, असे म्हणाला होता.
त्यावेळी या नेत्यांच्या बोलण्यामुळे या तालुक्यात पाणी येणार नाही, ही मानसिकता लोकांची झाली होती, ज्यांना प्रेम दिले, त्यांनीच या लोकांच्या डोळ्यात अश्रू दिले, अशी टीका शरद पवार यांच्यावर केली.
बारामतीला कधी शरण गेलो नाही, म्हणूनच हे पाणी माणगंगेत वाहतेय. हे पाणी सहज आले नाही, १५ वर्षाच्या अपार कष्टामुळे पाणी आणणे शक्य झाले. पाणी आणण्याचा संकल्प केल्यानंतर आता संकल्पपूर्तीचा क्षण अनुभवताना आनंद होत आहे.
प्रत्येक निवडणुकीत संघर्ष करायला भाग पडले नसते, तर मला हे शक्य नव्हते. त्यामुळे ज्यांनी मला आमदार होण्याची संधी दिली त्यांनाही आणि ज्यांनी संघर्ष करायला भाग पाडले त्यांनाही धन्यवाद! असे म्हणत आ.गोरे यांनी विरोधकांना धन्यवाद दिले.
सध्या चारमाही असलेले पाणी येत्या एक वर्षात आठमाही माणगंगेत प्रवाहित होईल. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहचवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.
\इथून पुढची निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर मी लढणार नाही. इथून पुढची लढाई जगाच्या स्पर्धेसोबत असेल, असे श्री. गोरे यांनी सांगितले.
यावेळी गोंदवले बुद्रुकमधील अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत आ. जयकुमार गोरे यांना धन्यवाद दिले. महिलांनी गीतातून हीच भावना व्यक्त केली.
आ. गोरे भावासारखे…
बंधुप्रेम व्यक्त करून अनेक महिलांनी आ. जयकुमार गोरे यांना राख्या बांधल्या. आमदार गोरे भावाप्रमाणे पाठीशी उभे असल्याने आपण परत एकदा त्यांनाच साथ देणार असल्याचे ही महिलांनी सांगितले.
कृष्णामाईच्या पाण्याला पावसाचे पाणी म्हणणाऱ्या लोकांना पावसानेही म्हसवडपर्यंत पाणी पोहचेपर्यंत संधी दिली नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.


