Pangolin Smuggling – वन विभागाने महाबळेश्वर बस स्थानक परिसरात सापळा रचून खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या प्रसाद तुकाराम गोसावी (रा. मानपाडा, डोंबिवली) याला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ५.९८० किलो वजनाचे खवले जप्त करण्यात आले असून संशयिताला न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणहून बसने प्रवास करून एक व्यक्ती खवले मांजराचे खवले विक्रीसाठी महाबळेश्वरमध्ये येणार होती. त्यानुसार दि. १८ रोजी बस स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. संशयास्पद हालचाल करणाऱ्या प्रसाद तुकाराम गोसावी याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे जवळपास ६ किलो खवले आढळून आले. महाबळेश्वर जंगल. खवले मांजराचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची १ मध्ये असल्याने या प्राण्याची शिकार किंवा त्याच्या अवयवांची विक्री करणे गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणी प्र. गु. रि. क्र. ०४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून काल दि. १९ रोजी त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत वन कोठडी सुनावली. सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, दिगंबर जाधव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पथकात वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्यासह वनरक्षक बा. भ. मराडे, तुकाराम निकम, संतोष काळे, विशाल जाधव, समीर उतेकर आणि गणेश वागदरे यांचा समावेश होता. वन विभागाचे आवाहन अवैध शिकार किंवा वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी हा गंभीर गुन्हा असून यासाठी ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. अशा प्रकारच्या घटनांची माहिती त्वरित वन विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे.