पुणे – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आणि संगीतमार्तंड पं. पंडित जसराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. सवाई गंधर्व महोत्सवाबाबतदेखील त्यांना आपुलकी, निष्ठा होती. महोत्सवात सादरीकरणासाठी महिनाभर आधीपासूनच त्यांची तयारी असायची. पंडितजींच्या निधनानंतर या महोत्सवाप्रती आपली जबाबदारी अधिक वाढली असे ते मानत असल्याचे पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी सांगितले. “आर्य संगीत प्रसारक मंडळा’तर्फे आयोजित 68 व्या “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवां’तर्गत आयोजित “अंतरंग..एक अनोखी रसयात्रा’ या कार्यक्रमात त्या बोलत होते. कार्यक्रमात दुर्गा जसराज आणि पं. जसराज त्यांचे भाचे आणि शिष्य पं. रतन मोहन शर्मा हे पं. जसराज यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि गायक श्रीनिवास जोशी यांनी या दोघांशी संवाद साधला. यावेळी पं. जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे, पं. रतन मोहन शर्मा यांचे पुत्र आणि गायक स्वर शर्मा उपस्थित होते. पंडित जसराज आणि चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या आठवणीही दुर्गा जसराज यांनी सांगितल्या. माझी आई मधुरा आणि वडील जेव्हा कोलकात्यात राहत होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यावेळी एकदा व्ही. शांताराम घरी आले आणि माझ्या वडिलांना म्हणाले, की तुला सध्या काम मिळत नाही तर तू वसंत देसाई यांच्या सोबत बस आणि तुम्ही एका चित्रपटासाठी संगीत द्या, असे सांगितल्यावर वडिलांनी अतिशय नम्रपणे ही संधी नाकारली. अशा काही आठवणी जसराज यांनी सांगितल्या. कार्यक्रमात रतन मोहन शर्मा यांनी पं. जसराज यांच्यासोबतच्या संगीत शिक्षण विषयक आठवणीना उजाळा दिला.