Pandharpur News : वटपौर्णिमेलाच काळाचा घाला! पतीला वाचवताना पत्नीचा दुर्दैवी अंत; पंढरपूर हळहळलं
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur News) आंबे गावातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Pandharpur News : एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur News) आंबे गावातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतातील पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याचा (Pandharpur News) विजेचा तीव्र धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण बाबू नागणे (वय ६० वर्ष) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय ५५ वर्ष) अशी या दुर्दैवी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण आंबे गावावर शोककळा पसरली आहे.
पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीनेही गमावला जीव
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्याने शेतातील विहिरीवरील मोटर (शेतीपंप) बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे हे शेतात गेले होते. मात्र, पाऊस आणि ओल्या जमिनीमुळे तिथे आधीच वीजप्रवाह उतरला होता. लक्ष्मण यांनी स्वीचला हात लावताच त्यांना विजेचा जोरदार झटका बसला.
पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून आणि ते वेदनेने विव्हळत असल्याचे लक्षात येताच, जवळच असलेल्या त्यांच्या पत्नी अलका नागणे या कोणत्याही परिणामाची पर्वा न करता पतीच्या दिशेने धावल्या. त्यांनी पतीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने वीजप्रवाह सुरू असल्याने त्यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. पाऊस आणि विजेच्या तांडवापुढे या दाम्पत्याचा काही क्षणांतच जागीच अंत झाला.
ग्रामस्थांची घटनास्थळी धाव
शेतातून बराच वेळ दोघेही घरी न परतल्याने आणि घटनेची कुणकुण लागताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत निसर्गाने आणि काळाने आपला खेळ केला होता. ग्रामस्थ पोहोचण्यापूर्वीच या दांपत्याची प्राणज्योत मालवली होती.
‘त्या’ पवित्र दिवशीच नियतीचा क्रूर डाव
आज वटपौर्णिमा… ज्या दिवशी देशभरातील आणि राज्यातील हिंदू सुवासिनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, सात जन्माची सोबत मिळू दे, यासाठी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास ठेवतात. घरात वटपौर्णिमेच्या सणाची आणि पूजेची तयारी सुरू होती. मात्र, नियतीने घातलेल्या या छाप्यामुळे नागणे कुटुंबातील सणाचा उत्साह काही क्षणांतच मातीआड झाला. पतीचे प्राण वाचवताना पत्नीनेही आपले प्राण अर्पण केले, या घटनेने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.
महावितरण आणि पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन (Pandharpur News) आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शेतातील वीजप्रवाह नेमका कशामुळे उतरला, यामध्ये महावितरणचा काही निष्काळजीपणा आहे का, याचा अधिक तपास सध्या पोलीस आणि महावितरणचे पथक करत आहे. या घटनेमुळे आंबे गावासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.






