पंढरपूर : आज राज्यभरातून लाखो वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी विठुनगरीत दाखल झाले आहेत. मात्र यादरम्यान एका वारकरी कुटुंबासंदर्भात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये विठुरायाचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघात झाला आहे. या अपघातात पतीने पत्नीच्या डोळ्यांदेखत आपला जीव सोडला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडलं नेमकं? पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथे अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी (दि,६) सकाळी १० च्या सुमारास घडला. या अपघातात मल्हारी बाजीराव पवार ( वय ५७, वर्षे धंदा शेती, रा. येळपणे पोलीस वाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला आहे. आज आषाढी एकादशीला मल्हारी पवार हे पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय,५०) यांच्यासह दुचाकीवरून (एम.एच.१६ ए.जी 2343) भिगवण येथून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते. देवदर्शन करून दुचाकीने परतत असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण इथं पोहोचले असता भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. जोराची धडक बसल्यामुळे दुचाकी टँकरखाली सापडली. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीपंखाबाई मल्हारी पवार गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम भिगवण पोलीस करीत आहेत.