पाचगणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई अट्टल दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या

पाचगणी : पाचगणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार तसेच पर्यटकांचे किमती सोने लुटणारा आरोपी ताब्यात घेऊन त्याचेकडून ५,१०,०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की १०/०९/२०२४ रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात लक्ष्मी स्टोअर समोर लावलेली गॅबरेल फ्रांसीस जोसेफ यांच्या मालकीची अंदाजे ५०,०००/- रू किंमतीची हिरो कंपनीची प्लेझर मोटर सायकल (क्र. एमएच ११ सीपी ८८७८ ) ही मोटर सायकल तसेच अविराम मेडिकल समोर एकनाथ काशिनाथ पवार रा. खिंगर यांची अंदाजे ४०,०००/- रू किंमतीची हिरोहोंडा कंपनीची सिडी डॉन मोटर सायकल (क्रमांक एमएच ११ एसी २७१ ) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या दोन गाड्या चोरणारा चोरटा आरोपी प्रितम सुनिल शिंदे (वय ३० रा. दामले आळी, गंगापुरी वाई ) यास वरील गुन्ह्यातील दोन्ही मोटर सायकल असा एकुण ९०,०००/- रूपयाचा माल हस्तगत केला आहे. त्याच्यावर कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याच पद्धतीने १२.०९.२०२४ रोजी पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले पर्यटक इंदुबेन जगदीश ठक्कर (रा. कांदीवली मुंबई) यांचे रूममधुन ७०,०००/- रू किमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोन अंगठ्या चोरीस गेल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत गुन्हयातील आरोपी माधव केशव लटपटे (वय २० रा. कोदरी ता. गंगाखेड जि. परभणी) यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयात गेलेल्या दोन्ही हिरेजडीत अंगठया असा एकुण ७०,०००/- रू किंमतीचा माल हस्तगत केला. त्याचेवर कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच चालु वर्षी सन २०२४ मध्ये पाचगणी परिसरातुन गहाळ झालेले मोबाईलचा शोध लागण्याकरीता विशेष प्रयत्न करून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ३५ मोबाईलचा शोध लावुन संबंधीतांना त्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उप विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरून पाचगणी पोलीस ठाणेचे सपोनी दिलीप पवार, पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनूने, तपासी अंमलदार पो. हवालदार श्रीकांत कांबळे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस हवालदार विनोद पवार, उमेश लोखंडे, अमोल जगताप यांनी या सर्व आरोपींना शोधण्यात यश मिळवले. तातडीने कारवाई करून या गुन्हेगारांना शोधण्यात यश मिळवले. याबाबत पाचगणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





