प्रभात वृत्तसेवा पाचगणी – शहरात कोकेन तस्करीचा पर्दाफाश करत पाचगणी पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून दहा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन आलिशान चारचाकी वाहने व मोबाइल हँडसेट असा एकूण सुमारे ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घाटजाई मंदिर परिसरात कोकेन विक्रीसाठी एक व्यक्ती थांबलेला असून त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून त्याने निळ्या रंगाची पँट व पिवळसर रंगाचा टी- शर्ट परिधान केल्याची माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपअधीक्षक सुनील साळुंखे (वाई विभाग) यांना कळवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असल्याने त्यांची मदत घेत मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान विस्टा ग्रॅन्ड सोसायटीतील इस्टेला १ ए बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभी असलेली पांढऱ्या रंगाची स्कोडा रॅपिड कार (एमएच ०२- डीएन ०२५९) तपासली असता त्यात पाच जण बसलेले आढळले. त्याच ठिकाणी एम. जी. हेक्टर कारमध्ये (एमएच ०१ डीके ८८०२) आणखी पाच जण आढळले. असे एकूण १० संशयित पोलिसांच्या ताब्यात आले. झडतीमध्ये संशयितांकडे ५ लाख रुपये किमतीचा कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाइल फोन असा मुद्देमाल सापडला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४२ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयितांनी चौकशीत हे कोकेन पाचगणी शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर तपास करीत आहेत.