कोल्हापूरला महापुरचा विळखा घट्ट; पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. राधानगरी धरण 100% भरल्याने पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 8,640 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत असल्याने पंचगंगा नदी धोका पातळीवर असल्याने कोल्हापूरला महापुराचा विळखा आणखीन घट्ट होणार आहे.
पंचगंगा ही 43 फुटांच्या वर अर्थात धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने पूरग्रस्त भागातील लोकांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने एका राष्ट्रीय महामार्गासह 11राज्य मार्ग, 29 प्रमुख जिल्हा मार्ग , 13 इतर जिल्हा मार्ग आणि 25 ग्रामीण मार्ग पुराचे पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीबरोबरच जनजीवन विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ७०० हुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्येही अनेक पूरग्रस्त नागरिक राहत आहेत. यामध्ये कोल्हापूर शहराबरोबरच पन्हाळा, हातकणंगले, करवीर , शिरोळ या तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांचा समावेश आहे. राधानगरी बरोबरच दूधगंगा धरणातून 1000 क्युसेक , वारणा धरणातून 10460 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. कोल्हापूरहून गगनबावडा मार्गे सिंधुदुर्गाकडे जाणारी आणि कोल्हापूरहून पन्हाळा मार्गे रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन, महापालिकेचे प्रशासक के म्हणजे लक्ष्मी यांच्यासह सर्वच विभाग प्रमुख यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याबाबतचे आदेश पारित केले असून महसूल विभागाचे कर्मचारी पोलीस विभागाचे कर्मचारी रस्त्यावरती उतरून स्थलांतर करताना सरसावत आहेत. एनडीआरएफची एक तुकडी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन पूरस्थितीचा आढावा घेत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पक्षाच्या वतीने संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याने आता कोल्हापूर आणि सांगलीला बसणाऱ्या पुराच्या फटक्यातून काहीसा दिलासा मिळणार असल्याची सांगितले जाते.





