सातारा – जिल्ह्यातील 11 तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदांच्या आरक्षणासाठी बुधवारी दि. 11 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदासाठीची प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यामधील 11 पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांच्याकरिता 13 जानेवारी 2020 पासून पुढील कालावधीकरीता पंचायत समिती सभापतिपदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पंचायत समितीमधील विद्यमान सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले आहे. सभापती व उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. त्याबाबतच्या बैठकीची सूचना जिल्हाधिकारी सातारा यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी पंचायत समिती सदस्यांना देतील, असेही श्री. शिंदे यांनी कळविले आहे.