Pune Rural : मुळशी तालुक्यात पाणंदसह पाणंद रस्ता सप्ताह साजरा होणार: तहसीलदार विजयकुमार चोबे यांची माहिती

पौड : मुळशी तालुक्यात पाणंद रस्ता सप्ताह साजरा होणार असून तालुक्यात नकाशावर असलेल्या पाणंद, शिवार, शेत व ग्रामीण रस्त्यांना अधिकृत क्रमांक देण्यात येणार आहेत. तालुक्यात हा उपक्रम सध्या चांदे, भोईरवाडी, नांदे, सावरगाव, असदे, भेगडेवाडी, रिहे, भुकूम, पिरंगुट, कासारअंबोली, बोप्तरवाडी, जांबे, नेरे-दत्तवाडी, डोंगरगाव, वाळेण, कोळवण, माळेगाव, मुठा, पिंपरी, वांद्रे, साईव खुर्द, भोईणी, अकोले, खेचरे, माले, निवे, शेडाणी, कुंभेरी या गावांची पाणंद रस्ते शिवार फेरी बाबत निवड करण्यात आली असून सदर गावे दिनांक १७.०९.२०२५ ते दिनांक ०२.१०.२०२५ या कालावधीत राबवावयाच्या सेवा पंधरवड्यामध्ये राबवला जाणार आहे.
राज्य शासनाच्या २९ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार आणि महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तहसील कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.
महसूल सप्ताहाचाभाग म्हणून १७ ते २२ सप्टेंबरच्या दरम्यान ‘पाणंद रस्ता सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत सर्व गावातील नकाशे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश भूमी अभिलेख कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. गावातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयाने शिवार फेरी काढून नकाशावरील उपलब्ध रस्त्यांची नोंद प्रपत्र १ मध्ये तर वहिवाटीचे रस्ते, पाणंद व शेत रस्त्यांची नोंद प्रपत्र २ मध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.





