मुंबई: भारत हा जगातील वनस्पति तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार देश असून चालू मार्केटिंग वर्षात देशाच्या खाद्यतेल आयातीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. पाम ऑइलच्या किमती वाढल्यामुळे आणि त्या तुलनेत सोयाबीन तेल स्वस्त पडत असल्याने भारतीय व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा सोयाबीन तेलाकडे वळवला आहे. परिणामी, ऑक्टोबर २०२५ मध्ये संपलेल्या मार्केटिंग वर्षात पाम ऑइलची आयात १६ टक्क्यांनी घटून पाच वर्षांच्या निचांकी पातळीवर आली आहे, तर सोयाबीन तेलाच्या आयातीने मात्र आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात पाम ऑइलची आयात ७५.८ लाख मेट्रिक टन इतकी झाली आहे, जी २०१९-२० नंतरची सर्वात कमी आयात ठरली आहे. याउलट, सोयाबीन तेलाची आयात ५९ टक्क्यांनी वाढून ५४.७ लाख टनांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. पाम ऑइल आणि सोयाबीन तेलातील किमतीतील तफावत कमी झाल्यामुळे रिफायनर्सनी सोयाबीन तेलाला अधिक पसंती दिली आहे. या बदलामुळे भारताच्या एकूण खाद्यतेल आयातीमध्ये पाम ऑइलचा वाटा ५६ टक्क्यांवरून घसरून ४७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाम ऑइलच्या उत्पादनात इंडोनेशिया आणि मलेशिया अग्रेसर आहेत, मात्र भारताने खरेदी कमी केल्यामुळे या देशांमध्ये साठा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, भारताने खाद्यतेल आयातीवर यंदा विक्रमी खर्च केला असून तो १.६१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा खर्च १.३२ लाख कोटी रुपये इतका होता. सूर्यफूल तेलाच्या आयातीतही यंदा १६.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नेपाळमधून होणाऱ्या रिफाइंड वनस्पति तेलाच्या आयातीतही यंदा लक्षणीय वाढ झाली असून ती ७.४६ लाख टनांवर पोहोचली आहे. प्रादेशिक व्यापार करारामुळे नेपाळला शुल्कमुक्त प्रवेश मिळत असल्याने ही वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात सणासुदीसाठी आधीच मोठी खरेदी झाल्यामुळे रिफायनरींनी आयातीत कपात केली असून यामुळे महिन्याभराच्या एकूण खाद्यतेल आयातीत २० टक्क्यांची घट दिसून आली आहे.