Palkhi Marg: वारकऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? पालखी महामार्गावर कचरा अन् चिखल; प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?
Palkhi Marg: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला महिनाभराचा अवधी; पूर्व हवेलीत कचरा, चिखल आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे चिंता.

Palkhi Marg : संत तुकाराम महाराजांची पालखी 11 जुलै रोजी पूर्व हवेलीतील पुणे-सोलापूर महामार्गावरून मार्गस्थ होणार असताना पालखी मार्गावरील विविध समस्या अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गालगत साचलेला कचरा, तुटलेल्या संरक्षण जाळ्या, रस्त्याच्या कडेला पडलेली माती, पाणी साचण्याची समस्या आणि सुरक्षेच्या अपुर्या उपाययोजनांमुळे वारकर्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेवाळेवाडीपासून उरुळी कांचनपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले असून कोरेगावमुळ, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत ही समस्या अधिक तीव्र असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेषतः कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर परिसरात पारंपरिक कचरा टाकण्याच्या ठिकाणांवर निर्बंध आल्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. पालखी आगमनापूर्वी किमान परिसर स्वच्छ केला जाईल का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी पालखी तळांची स्वच्छता आणि तयारी पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनीही पालखी तळांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या आहेत. मात्र पालखी तळांपुरतीच तयारी मर्यादित राहू नये, तर संपूर्ण पालखी मार्गाची सुरक्षितता आणि स्वच्छता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महामार्गालगत अनेक ठिकाणी जाहिरातींचे बॅनर वाकलेल्या अवस्थेत खांबांवर लटकलेले आहेत.
काही ठिकाणी लोखंडी खिळे उघडे पडल्याने वारकर्यांना दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर मातीचे ढीग साचले असून पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरेगावमुळ येथील इनामदार वस्ती परिसर, उरुळी कांचन येथील ओढ्यावरील पूल तसेच इतर अनेक ठिकाणी कचर्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
रस्त्यालगतच्या संरक्षण जाळ्या तुटलेल्या व वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील चढ-उतार आणि पावसाचे साचणारे पाणी यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
पालखी तळ नव्हे, संपूर्ण मार्ग सुरक्षित हवा
मागील वर्षी उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी कदमवाकवस्ती येथील पालखी तळाची पाहणी करून वारकर्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश दिले होते. मात्र पालखी तळावरील सुविधा आणि संपूर्ण पालखी मार्गावरील प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारकर्यांची सेवा म्हणजे केवळ मुक्कामस्थळी सुविधा उपलब्ध करून देणे नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.





