पालखी महामार्ग भूसंपादनाचा लवकरच श्रीगणेशा

वासुंदे (वार्ताहर) – पालखी महामार्ग जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा, या मागणी स्थानिक शेतकरी दिवसेंदिवस प्रतीक्षा करत होते. मात्र, हे काम गेले कित्येक दिवस लालफितीत अडकून पडले होते. प्रशासनाकडून त्यास कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता. देहू ते पंढरपूर पालखी महामार्ग नूतनीकरणाची घोषणा केंद्र शासनाने केली. तसे राजपत्र प्रसिद्ध होऊन शेतकऱ्यांना नोटिसा मिळून रीतसर मोजणी झाली. पंचनामेही झाले. मात्र, कित्येक दिवस परिस्थिती “जैसे थे’ होती.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाचे सडक परिवहन मंत्रालयाने हाती घेतले असून पालखी मार्गाचे पाटस-वासुंदे-बारामती बाह्यवळणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या पाटस येथील बारामती फाटा चौकापासून सुरू होणाऱ्या पालखी मार्गाची भूसंपादन प्रक्रिया मार्गी लागणार आहे.
संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी लागणारी रक्कम उपलब्ध झाल्याने भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली आहे. या महामार्गाच्या कामासाठी दौंङ तालुक्यातील पाटस, रोटी, हिगणीगाडा व वासुंदे या गावातील जमिनी संपादित होणार आहेत. तर बारामती तालुक्यातील खराडेवाडी, उंडवडी, गोजुबावी, कटफळ, एमआयडीसी, वंजारवाडी, रुई, सावळ, पिंपळी लिमटेक, काटेवाडी गावातून या रस्त्यांसाठी भूखंड संपादित करण्यात येणार आहेत.येथील पालखी महामार्ग संदर्भात प्रशासकीय कामकाज कागदोपत्री 80 ते 90 टक्के पूर्ण आहे. बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणे निधी उपलब्ध झाल्याने सुकर झाले आहे.
असे होणार काम
टप्पा क्रमांक- 1
रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, खराडेवाडी, उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, कन्हेरी, वंजारवाडी, कटफळ यासाठी 343 कोटी मंजूर झालेले असून भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे.
टप्पा क्रमांक-2
काटेवाडी, कन्हेरी, पिंपळी, शेळगाव, इंदापूर, लासुर्णे, बेलवाडी, जाचकवस्ती, हगारेवाडी, भरणेवाडी, शिरसटवाडी, जंक्शन, गोखळी, अंथुर्णे, तरंगवाडी व गोतोंडी या टप्प्यासाठी 142 कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे.





