तुकोबांचा पालखी सोहळा काटेवाडीत; अजित पवारांकडून पालखीचं ”सारथ्य” तर सुप्रिया सुळेंकडून ”स्वागत”

काटेवाडी । बारामती तालुक्यातील मुक्काम आटोपून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने काटेवाडी कडे प्रस्थान केले आहे. काटेवाडी गावच्या शिवेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालखीचे स्वागत करून काटेवाडी गावापर्यंत पालखी मध्ये बसून पालखीचे सारथ्य केले तसेच पालखी बरोबर चालत जाऊन पालखी ओटा याठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सौ सुप्रिया सुळे व विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी पालखीचे स्वागत केले.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने काटेवाडी मध्ये प्रस्थान केले असता ग्रामस्थांबरोबर विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार तसेच श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, हभप सुनील काटे, उपसरपंच मिलिंद काटे, विद्याधर काटे, अजित काटे, आमिर मुलाणी, जितेंद्र काटे, यांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी ओटा याठिकाणी विसाव्यासाठी आणली.
यावेळी पालखी खांद्यावर घेतल्यापासून विसाव्यापर्यंत काटेवाडी गावातील परीट समाजाच्या नागरिकांना मान असलेल्या बाळासाहेब नवरे, दत्तात्रय ननवरे, राहुल ननवरे, संतोष ननवरे, राजेंद्र ननवरे, बाळासाहेब ननवरे, यांनी धोतराच्या पायघड्या घालत ही पालखी पालखी ओटा याठिकाणी आणली.
यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहिला या पालखीमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले या अगोदर शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व वारकऱ्यांना खासदार सौ सुप्रिया सुळे व विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या हस्ते रेनकोट, मोबाईल कव्हर, पाणी बॉटल आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले. यावेळी पालखी ओटा या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले.





