पिंपरी | चांदखेडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालखी सोहळा

चांदखेड, (वार्ताहर) – येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, व्यसनमुक्ती जनजागृती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
आषाढी एकादशीनिमित्त आळंदी येथून ज्ञानेश्वरांची, देहू येथून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांची, पैठण येथून एकनाथांची आदी संतांच्या पालख्या वारकरी भाविकांसोबत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतात. वारीचा हा सुखसोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या पवित्र संस्कृतीचा अप्रतिम नजारा असतो. त्यामुळे दरवर्षी न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड येथे विद्यार्थ्यांना वारीची अनुभूती करून दिली जाते.
त्यानुसार शनिवारी विद्यालयात श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेचे प्रतिमा पूजन, सोबत पवित्र ग्रंथांचे पूजन मुख्याध्यापक अजिनाथ ओगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी तालासुरात अभंग गायन सादर केले. विद्यार्थ्यांनी विठ्ठलप्रेमाचा भाव व्यक्त करणारे अनेक नृत्य सादर केले.
त्यामुळे विद्यालयाचे वातावरण भक्तिमय झाले होते. ग्रामपंचायत ठिकाणी बाल वारकऱ्यांची ही पालखी पोहचली, तेव्हा तिथे व्यसनमुक्ती बाबत जागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. मुख्याध्यापक अजिनाथ ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सरला भोये यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान पवार यांनी केले.





