Bribery Case : राज्यभर लाचलुचपतविरोधी कारवाया सुरू असताना पालघर जिल्ह्यात ACB ने मोठी कारवाई करत वैद्यकीय अधिकाऱ्याला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील गंजाड अंतर्गत आंबेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे (वय 34) यांना सापळा रचून पकडण्यात आले. तक्रारदाराच्या इको वाहनाचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी डॉक्टर वारंवार लाचेची मागणी करत होते. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर 17 मार्च 2026 रोजी सापळा रचण्यात आला आणि डॉक्टर सांगळे यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारित 2018) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, राज्यात एसीबीच्या धडक कारवायांमुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बीडमध्ये तहसीलदार निलंबित लाच प्रकरणात अटक करण्यात आलेले परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. माहितीनुसार, सॉल्वन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी मुंडे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.