पळसदेव, -पळसदेव गावात सतत महावितरणची बत्ती गूल होत आहे. त्यामुळे पळसदेवकर हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. तर रात्रीदेखील हीच अवस्था असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. तर दहावीच्या परीक्षा तोंडावर आहेत, अशात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी खंडीत वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकतर करोनामुळे शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत. आता कुठे परिस्थिती सुरळीत झाली आहे. त्यात 10वी व 12वी च्या परीक्षा ऑफलाइन होत असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण आहे. सध्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पाहावयास मिळत आहेत. त्यातच वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा खंड पडत आहे. महावितरणचे अधिकारी बत्ती गुलची समस्या सोडवण्याऐवजी ते केवळ वसुलीत गुंग आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काही घेणे देणे नाही ते फक्त सरकारच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यावर लक्ष देत आहेत असा आरोप पळसदेव भाजपचे अध्यक्ष रावसाहेब काळे व ग्रामपंचायत सदस्य दीपाली काळे यांनी केला आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. वीज नसल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तरी महावितरण अधिकाऱ्यांनी तातडीने खंडीत वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढून किमान रात्रीच्यावेळी तरी गावठाणातील वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.