Wing Commander Abhinandan। पाकिस्तानमधून एक मोठी बातमी येत आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा याठिकाणी टीटीपी (तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान) ने केलेल्या हल्ल्यात मेजर मोईझ अब्बास शाह नावाचे एक अधिकारी शहीद झाले आहेत. मेजर मोईज अब्बास शाह हे तेच अधिकारी आहेत ज्यांनी २०१९ मध्ये बालाकोट स्ट्राइक दरम्यान भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते. पाकिस्तानी लष्कराच्या म्हणण्यानुसार, टीटीपीच्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शाह आणि लान्स नाईक जिब्रान मारले गेले. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की त्यांनी चकमकीत टीटीपीचे ११ सदस्य मारले आहेत. पाकिस्तनाच्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने मंगळवारी खैबर पख्तूनख्वाच्या दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यात गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाईत दोन सैनिक ठार झाल्याचे सांगितले. पाकिस्तानी लष्कराचे मेजर मोईज अब्बास शाह Wing Commander Abhinandan। इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या निवेदनानुसार, “२४ जून २०२५ रोजी, सुरक्षा दलांनी दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यातील साराओघा भागात एक कारवाई केली. या कारवाईत मेजर मोईज अब्बास शाह आणि लान्स नाईक जिब्रान शहीद झाले. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग आयएसपीआरने म्हटले आहे की, मेजर मोईझ हे पाकिस्तानी दहशतवादाविरुद्धच्या अनेक कारवायांमध्ये त्यांच्या धाडसी कारवायांसाठी ओळखले जात होते. तथापि, आयएसपीआरने बालाकोट स्ट्राइकचा उल्लेख केलेला नाही. भारताचा बालाकोट हल्ला अन् विंग कमांडर अभिनंदनची अटक Wing Commander Abhinandan। १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जेव्हा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य केले तेव्हा देश स्तब्ध झाला होता. या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. प्रत्युत्तरादाखल, भारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. भारतात याला बालाकोट एअरस्ट्राइक म्हणून ओळखले जाते. या हल्ल्यात जैशचे अनेक मोठे दहशतवादी मारले गेले. दुसऱ्या दिवशी, २७ फेब्रुवारी रोजी, पाकिस्तानी हवाई दलाने (पीएएफ) प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. विंग कमांडर अभिनंदन तेव्हा श्रीनगरमधील ५१ स्क्वॉड्रनमध्ये तैनात होते आणि मिग-२१ बायसन उडवत होते. त्यांनी पीएएफच्या एफ-१६ लढाऊ विमानाला लक्ष्य केले. अभिनंदनने या पाकिस्तानी एफ-१६ ला आव्हान दिले आणि आकाशात त्याचा पाठलाग सुरू केला. प्रदीर्घ लढाईनंतर त्याने एफ-१६ पाडले. पण या डॉगफाइट दरम्यान, एका पाकिस्तानी क्षेपणास्त्राने अभिनंदनच्या मिग-२१ विमानाला धडक दिली. अखेर त्याला विमानातून बाहेर पडावे लागले पण तोपर्यंत तो नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये घुसला होता. पाकिस्तानमध्ये अटक जेव्हा अभिनंदन पॅराशूटने पीओकेमध्ये उतरले तेव्हा स्थानिक पाकिस्तानी लोकांनी त्यांना भारतीय पायलट समजून त्यांच्यावर हल्ला केला. अभिनंदन यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळ्या झाडल्या आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. पाकिस्तानी लष्करी अधिकारी मोईज अब्बास शाह यांनी आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांचे उल्लंघन करून अभिनंदन यांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा दावा केला जात आहे. तेव्हा पाकिस्तानने दावा केला होता की मेजर मोईजने विंग कमांडर अभिनंदन यांना पकडले होते. हाच पाकिस्तानी लष्करी अधिकारी आता टीटीपीच्या हल्ल्यात मारला गेला आहे.