लाहोर – इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे लोण आता पाकिस्तानच्या पोलिस खात्यातही पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून तेथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका हेड कॉन्स्टेबलचा आणि त्याच्या मेव्हण्याचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून काही हातबॉंब, आत्मघाती हल्ल्यांसाठी वापरण्यात येणारी स्फोटकांनी भरलेली जाकिटे, आणि अन्य स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
अमजद फिरदोस खान आणि शाहीद खान अशी अटक करण्यात आलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असून ते गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामिक स्टेटचे काम करीत होते. पोलिसांनी त्यांच्या गुज्जर पुरा भागात छापे टाकले त्यावेळी हे दोघेही जण पळून गेले. त्यानंतर त्यांना शोधून काढण्यात आले. आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे.