पाकिस्तानात माजी परराष्ट्र मंत्र्यांना अटक

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मुहंमद असिफ यांना आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा जादा संपत्ती जमवल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ते नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीग पक्षाचे नेते आहेत. ते पक्षाच्या बैठकीतून बाहेर येत असतानाच त्यांना नॅशनल अकाऊंटीबिलिटी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली.
असिफ हे वर्क परमीटवर सन 2004 ते 2008 या अवधीत दुबईत कामाला होते. तेथे त्यांनी 136 दशलक्ष रूपये कमाई केली असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. तेथे आपण कन्सल्टन्सी सर्व्हिस चालवत होतो असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांना या कामासाठी जो पगार मिळत होता त्याचा तपशील त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मागितला होता.
पण तो देण्यास ते असमर्थ ठरल्याने अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्यावरील अटकेच्या कारवाईचा माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकार सध्या सैरभैर झाले आहे त्यातून त्यांनी अशा स्वरूपाच्या कारवाया सुरू केल्या आहेत.
दरम्यान नवाज शरीफ यांच्या कन्या मरयम नवाज यांनी आरोप केला आहे की असिफ यांनी नवाज शरीफ यांच्या विरोधात आवाज उठवावा अशी अपेक्षा सरकारने व्यक्त करून त्यांच्यावर त्यासाठी दबाव टाकला जात होता. पण हा दबाव असिफ यांनी झुगारून लावल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.





