पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

इस्लामाबाद : पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार हे उद्या चीनच्या दौऱ्यावर जाणार असून ते चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. अफगाणिस्तानचे हंगामी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तगी हे देखील दिनांक २० मे रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार असून याच काळात दार, वँग यी आणि मुत्तगी यांच्यात त्रिपक्षीय चर्चा होणार आहे.
दार हे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या निमंत्रणावरून १९ ते २१ मे दरम्यान चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. विशेषतः दक्षिण आशियातील परिस्थिती आणि शांतता, स्थिरतेच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
याशिवाय पाकिस्तान-चीन आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या त्रिस्तरिय बैठकीतही दार सहभागी होणार आहेत. प्रादेशिक व्यापार, सुरक्षा सहकार्य वाढवणे आणि प्रामुख्याने भारत-पाकिस्तान दरम्यान अलिकडच्या काळातील तणावाच्या मुद्द्यावर तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा होणे अपेक्षित आहे.





