काश्‍मीरबाबतच्या पाकिस्तानची ओरड म्हणजे विष ओकणे

पाकिस्तानवर भारताची टीका

संयुक्‍त राष्ट्र : संयुक्‍त राष्ट्रामध्ये भारताविरोधात असत्य पसरवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांवर भारताने टीका केली आहे. पाकिस्तानने जम्मू काश्‍मीरचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायापुढे उपस्थित केला आणि भारताबद्दल द्वेष पसरवणारे भाषण केले. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना भारत मुळीच महत्व देत नाही, असे भारताने म्हटले आहे.

पाकिस्तान कश्‍मीरच्या मुद्दयाला संयुक्‍त राष्ट्राच्या विविध व्यासपीठावर सातत्याने उपस्थित करतो, पण पाठिंबा मिळविण्यात त्याला वारंवार अपयशच आले आहे. गेल्या आठवड्यातही पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनने त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र काश्‍मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय विषय आहे यावर परिषदच्या उर्वरित सदस्यांमध्ये एकमत झाले होते.

भारताबरोबरचे संबंध सर्वसामान्य होण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायापुढे असत्य पसरवण्याचा उद्योग करत आहे, असे संयुक्‍त राष्ट्रातील भारताचे कायम स्वरुपी उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी कामकाजाबातच्या सर्वसामान्य बैठकीत सांगितले.

“ज्याप्रमाणे मासे पाणी घेतात, त्याच प्रमाणे पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळाने पुन्हा एकदा द्वेषमूलक भाषणे केली आहेत. प्रत्येकवेळी पाक शिष्टमंडळ बोलते तेंव्हा विषच ओकले जाते. दरवेळी असत्यच पसरवले जाते.’ असे नायडू यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तान दूतावासाचे समुपदेशक सद अहमद वराईच यांनी अधिवेशनात जम्मू-काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर भारताने कडक प्रतिसाद दिला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.