फुलपाखरू आणि पतंगाचा स्थानिक प्रजातींच्या कीटकांमध्ये समावेश
पुणे – पाकिस्तानी स्पिआलिया झेब्रा नामक फुलपाखरू आणि चीनमधील अट्राटोथेमिस रिल्सी हा पतंगा या दोन्ही कीटकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. या दोन्ही कीटकांचा समावेश आता भारतीय स्थानिक प्रजातींच्या कीटकांमध्ये करण्यात आला आहे.
भारतीय जैवविविधतेला संपन्नतेत आणखी भर पडणार आहे. भारतीय स्थानिक प्रजातीच्या कीटकांमध्ये आता फुलपाखरू आणि पतंगा या कीटकांच्या नवीन प्रजातीचा समावेश केला आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बाब मानली जाते. या प्रक्रियेची सुरुवात राजस्थान आणि अरुणचाल प्रदेश येथून झाली. राजस्थान येथील पक्षी अभ्यासक मुकेश पनवार यांनी 2014 साली डुंगरपूर येथे स्पिआलिया झेब्रा या फुलपाखराची नोंद घेतली. हे फुलपाखरू प्रामुख्याने पाकिस्तानमधील पंजाब प्रांत आणि खैबर-पख्तुनवा या भागात आढळते.
पनवार यांनी याबाबत त्यांनी उत्तराखंड येथील फुलपाखरू संदर्भात अभ्यास करणाऱ्या भीमताल फुलपाखरू संशोधन केंद्रास माहिती दिली. संस्थेतर्फे या नोंदीची दखल घेत, तब्बल सहा वर्षे या फुलपाखरूसंदर्भात अभ्यास केला. या अभ्यासानंतर नुकतेच या फुलपाखराचा समावेश भारतीय स्वदेशी प्रजातीतील फुलपाखरांच्या यादीत केला आहे. पुढील काळात त्याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. सद्य:स्थितीत भारतात 1 हजार 328 फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात.
याबरोबरच मुख्यत्वे चीनमध्ये आढळणाऱ्या अट्राटोथेमिस रिल्सी हा पतंगा भारतातील अरुणाचल प्रदेशमधील नामढाफा व्याघ्रप्रकल्पात आढळल्याची नोंद अभ्यासकांनी घेतली. मूळ स्थानापासून तब्बल 1 हजार 170 किमी दूरवरील प्रदेशात प्रथमच या कीटकाची नोंद केली आहे. यामुळे हिमालयातील जैवविविधतेत नक्कीच भर पडेल, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले.