india । pakistan – भारतीय तटरक्षक दलाने महत्वपूर्ण कारवाई करताना पाकिस्तानी नौका पकडली. त्या नौकेवरील ९ खलाशांना ताब्यात घेण्यात आले. ती कारवाई गुजरात किनारपट्टीलगत आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ घडली. अरबी समुद्रात बुधवारी रात्री तटरक्षक दलाचे जहाज गस्त घालत होते. त्यावेळी भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानी मच्छिमारांच्या नौकेने शिरकाव केल्याचे तटरक्षक दलाच्या जवानांनी हेरले. त्यानंतर तातडीने हालचाली करत त्या दलाने इशारा देत पाकिस्तानी नौका गाठली. पाकिस्तानी मच्छिमारांनी त्यांची नौका माघारी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटरक्षक दलाच्या जहाजाने ती नौका रोखली. नौकेतील खलाशांना ताब्यात घेऊन पोरबंदरला नेण्यात आले. तिथे त्यांना स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले. पाकिस्तानी नौका केवळ मासेमारीच्या उद्देशाने आली होती का याचा तपास पोलीस करतील. तूर्त तरी पाकिस्तानी नौकेची अवैध घुसखोरी भारतीय यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या पाकिस्तानी खलाशांची कसून चौकशी केली जाईल. त्यामध्ये पोलिसांबरोबरच इतर यंत्रणाही सहभागी होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली.