Mohammad Shayan Injury ahead IND vs PAK match : अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ मध्ये १ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शायान हा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान चेंडू नाकावर लागल्याने त्याला ही गंभीर दुखापत झाली. सरावादरम्यान भीषण अपघात – १८ वर्षीय मोहम्मद शायान हा सराव सत्रात यष्टीरक्षणाचा सराव करत होता. एका वेगवान गोलंदाजाचा चेंडू थेट त्याच्या नाकावर येऊन आदळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे स्कॅनमध्ये त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. दुखापतीचे गांभीर्य पाहता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) तो स्पर्धेतून बाहेर पडल्याची अधिकृत माहिती दिली आहे. त्याच्या जागी लवकरच नवीन खेळाडूचा संघात समावेश केला जाईल. हमजा जहूरवर मोठी जबाबदारी – भारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या खेळाडूला दुखापत शायान बाहेर पडल्याने पाकिस्तानसमोर यष्टीरक्षकाचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र त्यांच्याकडे हमजा जहूर हा पर्याय उपलब्ध आहे. सलामीवीर हमजा जहूर हा देखील यष्टीरक्षण करू शकत असल्याने भारताविरुद्धच्या सामन्यात तोच ही जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे. शायानने या स्पर्धेत दोन सामने खेळले होते, ज्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ७ धावा केल्या होत्या. हेही वाचा – Novak DJokovic : मेलबर्नमध्ये अनुभवाचा विजय! ४ तासांच्या थरारात जोकोविच सिनरवर मात करत फायनलमध्ये दाखल सेमीफायनलचे गणित; पाकला विजय अनिवार्य – पाकिस्तानने या स्पर्धेत संमिश्र सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानने स्कॉटलंड, जिम्बाब्वे आणि न्यूझीलंडवर मात करत जोरदार पुनरागमन केले. सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने हरवल्यासच पाकिस्तानचे सेमीफायनलचे तिकीट पक्के होऊ शकते. अशा स्थितीत मुख्य यष्टीरक्षक बाहेर पडणे हा पाकिस्तानसाठी मोठा मानसिक धक्का मानला जात आहे.