इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने सुमारे 2 लाख नागरिक ओळखपत्रांची नोंदणी रद्द केली आहे. ही कॉम्प्युटराईज्ड कार्डे अफगाणी नागरिकांकडे आढळली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गृहमंत्री शेख रशिद अहमद यांनी रावळपिंडी इथे याबाबतची माहिती दिली.
तब्बल 15 लाख अफगाणी निर्वासितांकडे पाकिस्तानातील कायदेशीर दर्जा आहे. तसेच देशातील 8 लाख अफगाणी नागरिक पाकिस्तानात रहात असल्याची माहिती उपलब्ध आहे, असे अहमद यांनी सांगितले. व्हिसा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेतील भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच 192 देशातील् नागरिकांना व्हिसा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.
मानवी प्रक्रियेमध्येच भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने ऑनलाईन प्रक्रिया स्वीकारण्यात आली आहे. एक दिवसात ऑनलाईन व्हिसासाठी तब्बल 2 लाख अर्ज आले असल्याचेही अहमद यांनी सांगितले.
सैन्य दलावर टीका करणाऱ्या व्यक्ती परदेशी देशांसाठी हे काम करीत अहेत आणि सेना दलाविरोधी भाष्य करणाऱ्यांवर 72 तासांत कारवाई केली जाईल, असेही शेख रशिद अहमद यांनी सांगितले.
राजकारणातील लष्कराच्या हस्तक्षेपाच्या विरोधात 11 राजकीय पक्षांचा सहभाग असलेली “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ ही आघडी उघडण्यात आली असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्कराच्या मदतीने निवडणूका जिंकल्या असून आता ते लष्कराच्या हातचे बाहुले बनले असल्याची टीकाही या आघाडीने केली आहे.
या टीकेमुळे यापूर्वीच जमीयत उलेमा-इस्लाम फजलचे नेते मुफ्ती किफायतुल्ला यांच्याविरोधात लष्करावर केलेल्या टीकेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही अहमद यांनी सांगितले.