Pakistan : सरकारबरोबर नाही, मात्र लष्कराशी चर्चेला तयार – इम्रान खान

इस्लामाबाद :- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक सरकारबरोबर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला असून लष्कराबरोबर चर्चेला आपण तयार असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानमधील निर्णयाचे अधिकार पाकिस्तानातील सरकारकडे नसून खऱ्या अर्थाने लष्कराकडेच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर झाले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
मात्र दिनांक 9 मे रोजी देशभरात झालेल्या हिंसक आंदोलनामागे असलेल्यांना शिक्षा करण्यावर पाक लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर हे ठाम आहेत. अशा प्रकारच्या घटना देशात कोणत्याही परिस्थितीत पुन्हा होऊ दिल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी माजी लष्कर प्रमुख निवृत्त जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर आपला विश्वासघात केल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. आपण पंतप्रधान असताना किमान तीन वेळा जनरल बाजवा यांना लष्कर प्रमुख पदावरून हटवू शकलो असतो. मात्र आपण संयम बाळगल्याचे इम्रान म्हणाले.





