Pakistan Minister : पाकिस्तानी मंत्र्याला ताजमहाल, निजामुद्दीन दर्ग्याचे दर्शन घेता येणार नाही; केंद्र सरकारने नाकारली परवानगी
Pakistan Minister : एससीओ बैठकीसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांना ताजमहाल आणि निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याची परवानगी केंद्र सरकारने नाकारल्याचे वृत्त.

Pakistan Minister : शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) कार्यक्रमासाठी भारतात आलेले पाकिस्तानचे हवामान बदलविषयक मंत्री मुसादिक मलिक यांना ताजमहाल आणि दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याची इच्छा होती. मात्र, केंद्र सरकारने या भेटींना परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे. मलिक यांना केवळ एससीओच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुसादिक मलिक हे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान नवी दिल्लीतील ऐतिहासिक पुराना किल्ला येथे आयोजित पहिल्या एससीओ सभ्यता संवाद मंचासाठी भारतात आले आहेत. त्यांनी आग्रा येथील ताजमहाल आणि दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्याला भेट देण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांच्या भारत दौऱ्याचा उद्देश केवळ एससीओच्या बैठकीत सहभागी होणे हाच असल्याचे सांगत सरकारने अन्य ठिकाणी जाण्यास परवानगी दिली नसल्याचे वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
मलिक यांच्या व्हिसाची परवानगीही केवळ एससीओच्या कार्यक्रमासाठी असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केल्याचे ‘इंडिया टुडे’ने म्हटले आहे.
तीन वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्र्याचा भारत दौरा –
मुसादिक मलिक यांचा हा दौरा भारत-पाकिस्तान संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या एससीओच्या बैठकीत पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो सहभागी झाले होते. त्यानंतर प्रथमच पाकिस्तानचे संघीय मंत्री भारतात आले आहेत. मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात येणारे ते पहिले पाकिस्तानी मंत्री आहेत.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे संस्कृती आणि पर्यटनमंत्री यांच्या निमंत्रणावरून मुसादिक मलिक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या मंचावर ते विविध संस्कृतींमधील संवादाचे महत्त्व आणि या क्षेत्रातील पाकिस्तानची भूमिका मांडणार आहेत. एससीओच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
सिंधू पाणी करारावरून भारताला दिली होती धमकी –
मुसादिक मलिक यांनी यापूर्वी भारताच्या सिंधू पाणी करारासंबंधीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावर प्रतिक्रिया देताना जून २०२५ मधील एका कार्यक्रमात मलिक यांनी, पाकिस्तानच्या पाण्याला कोणी हात लावल्यास त्याचे हात तोडले जातील, अशी धमकी दिली होती.




