इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापुढील सर्व पर्याय संपुष्टात येत चालल्याने ते आपली सत्ता गमावतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 28 मार्च रोजी त्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. त्यात त्यांना पुरेसे संख्याबळ जमवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असल्याचे चित्र आहे. त्यात लष्करानेही सरकारची पाठराखण करणे सोडून दिले आहे असे सांगितले जात आहे. सध्या त्या देशांत ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून हा देश स्फोटक परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभा आहे असेही सांगण्यात येत आहे. स्वत:चा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने इम्रान खान आत्मघाती डावपेच खेळू शकतात ज्यात लष्करप्रमुखांना पदच्युत करण्याचाही प्रयत्न ते करू शकतात. ज्यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक होऊ शकते. किंवा ते स्वत:च्याच पक्षाचे नेते किंवा विरोधकांविरुद्ध काही हानीकारक व्हिडिओ किंवा दस्तऐवज जारी करण्याचा प्रयत्न करू शकतात असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी अविश्वास ठरावावरील मतदानाच्या दिवशी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह संसद सदस्यांना मारहाण करण्यासाठी राजधानीत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमवण्याचीही धमकी दिली आहे. यामध्ये अतिरेकी गटांतील त्याच्या समर्थकांचा समावेश असू शकतो. कोणताही सामूहिक हिंसाचार किंवा हल्ला त्यांच्या देशासाठी केवळ मृत्यू आणि विनाश आणू शकतो आणि त्यातून त्यांची दुःखद हकालपट्टी होऊ शकते, असे एका अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात आता कमालीचे संशयाचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यमान सरकार कोसळल्यानंतर पाकिस्तानच्या विविध भागांचा कब्जा घेण्यासाठी त्या देशांतील विविध गट टपले आहेत. हे लोक नेमकी काय परिस्थिती निर्माण करतील याचा अंदाज कोणालाही लागेनासा झाला आहे. इम्रान खान यांच्याच पक्षातील 24 खासदारांनी त्यांच्या विरोधात बंड करण्याची तयारी चालवली आहे असे सांगण्यात येते आहे. 28 मार्चला प्रत्यक्ष अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे, तो पर्यंत त्यांच्या पक्षातील बंडखोरांची संख्याही वाढू शकते असेही सांगण्यात येत आहे.