Pakistan Cricket : ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर पाकिस्तान संघात मोठे बदल होणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाल्यानंतर 24 तासांत मोठी बातमी आली आहे. संघाचे पांढऱ्या चेंडूचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पदभार सोडला आहे. एप्रिलमध्ये संघात दाखल झालेल्या कर्स्टन यांनी सहा महिन्यांतच संघ सोडला. आता पाकिस्तानचे रेड बॉल मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) यांच्याकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर जाहीर केले आहे की, जेसन गिलेस्पी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यासाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. कर्स्टन यांनी राजीनामा दिल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान कर्स्टन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचीही पीसीबीनं माहिती दिली आहे.
The Pakistan Cricket Board today announced Jason Gillespie will coach the Pakistan men’s cricket team on next month’s white-ball tour of Australia after Gary Kirsten submitted his resignation, which was accepted.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 28, 2024
गिलेस्पी यांना एप्रिलमध्येच कसोटी संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते आणि त्यांच्यासोबत दोन वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्याच्या आगमनानंतर पाकिस्तानला घरच्या मैदानावर सलग तीन कसोटी गमवाव्या लागल्या. बांगलादेशने त्यांना क्लीन स्विप केले आणि त्यानंतर इंग्लंडविरूध्द पाक संघाला पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या तीन सामन्यांनंतर गिलेस्पीला लक्ष्य केले जात होते. मात्र, पाकिस्तानने शेवटचे दोन कसोटी सामने सलग जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. तब्बल तीन वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकल्याने पाकिस्तान संघ खूप आनंदी आहे.
Pakistan Cricket : मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सोडला पदभार, समोर आलं ‘हे’ कारण…
पाकचा ऑस्ट्रेलिया दौरा 4 नोव्हेंबरपासून…
पाकिस्तानला पुढील महिन्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यासाठी मोहम्मद रिझवान संघाचा नवा कर्णधार असेल. मर्यादित षटकांचे कर्णधारपद सोडलेला बाबर आझमही या दौऱ्यात संघाचा भाग असेल. या दौऱ्याची सुरुवात 4 नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. यानंतर 8 आणि 10 नोव्हेंबरला पुढील दोन एकदिवसीय सामने खेळवले जातील. 14, 16 आणि 18 नोव्हेंबरला टी-20 मालिकेचे सामने होणार आहेत.